महाराष्टाच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी पासून सुमारे ५० किलोमिटर व राजापुर पासुन २२ किलोमिटरवर देवीहसोळ हे गाव प्रसिध्द आहे ते म्हणजे इथल्या श्री. आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी मंदिरासाठी. १२०० लोकसंख्या असलेले हे गाव आणि गावात १२ वाड्या असुन सर्व लोकं विभिन्न समाजाची असुन गावातील धार्मिक व इतर कोणताही कार्यक्रम असो किंवा सुख-दु:खात एकत्र येऊन एक दिलाने व एक मताने राहतात हे मुख्य वैशिष्ट आहे.
निसर्गाच्यासौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावाची ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहास हा रोमांचक आहे. ज्या ठिकाणी देवी वसलेली आहे तो परिसर शांत, रम्य आणि शहरी गोंगाटापासुन मुक्त आहे.
रत्नागीरी पासुन सागरी किनारी मार्गाने दक्षिणेकडील निघालेल्या प्रवासात आपल्याला कोकणातील माड, पोफळी ( सुपारीचे झाड ) च्या बागा ,सुरुची, आंबा,फणस व काजूच्या बागांच्या नयन रम्य अशा दर्शनाने मन तृप्त होते.या प्रवासादरम्यान पावस येथे श्री. स्वामी स्वरुपानंदाचा आश्रम आहे.त्याच्या पुढे गाव आडीवरे येथे प्रसिध्द असे महाकाळी मंदीर .महाकाळी देवीचे दर्शन होते. पुढे १० किलोमिटर अंतराने गावाच्या हद्दीत प्रवेश होतो आणि तिथून २ किलोमिटर अंतरावर देवीहसोळ गावाची ग्रामदेवता व गावाचे श्रध्दास्थान असलेलं श्री. आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी देवीचं मंदीर आहे.
श्री. आर्यादुर्गा देवी आणि श्री. जाकादेवी देवींचे मंदीर हे दोन्हीही मंदीरे शेजारी-शेजारी आहे. देवी आर्यादुर्गा मातेच्या उजव्या अंगाला सुमारे १०० मीटर कातळात कोरलेली पुरातन काळीतील पांडव काळीन विहीर (देवीचा आड) आहे. त्या विहीरीमध्ये तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.विशेष म्हणजे विहीरीचं पाणी निर्मळ आणि मधुर असुन त्या पाण्याचा वापर देवीच्या दैनंदीनी कामासाठी केला जातो .विहीरीचं पाणी कधीही आटत नाही. हे महत्व व देवीची कृपा आहे.श्री.आर्यादुर्गा देवी व श्री जाकादेवी मंदिराच्या सभोवताली २ किलोमीटरच्या भूपृष्टवंर कातळात कोरलेलं पुरातन वेगवेगळ्या छटा असलेलं कोरीव शिल्प आहेत. ह्या कातळशिल्पाना विशिष्ट्य धार्मिक महत्त्व आहे. ही कातळशिल्प पाहणे म्हणजे जणू संशोधनासाठी व पर्यटनासाठी पर्वणीच आहे. कोकन पर्यटन विकास आराखड्यात देवीहसोळ गावाच्या कातलशिल्पचा समावेश केला असून ही कातळशिल्प 10 हजार वर्ष जुनी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
विशेष सांगायचे म्हणजे देवीहसोळ गावची आखणी ही विशिष्ट पध्दतीची आहे.गावाच्या मध्यभागी श्री. गणपती बाप्पा विराजमान असुन बरोबर कातळ माथ्यावर विराजमान झालेल्या देवी श्री. आर्यादुर्गा माता व श्री. जाकादेवी माता संपूर्ण गावावर जणू काही आपल्या पंखात मायेची ऊब देत आपल्या खुशीत घेवून बसलेली आहे. गणपती बाप्पाच्या डाव्या दिशेला सुमारे काही अंतरावर मुजकुंदी नदी वाहते आणि तिच्या किनारीला श्री ब्राम्हण देवाचे मंदीर आहे. पुढे काही अंतरावर गेल्यावर माता श्री. निनावी देवीचे मंदीर आहे. तिथुन पुढे मुजकुंदी नदीच्या किनारपट्टीला लागुनच श्री. भराडी देवीचं स्थान आहे. आशा प्रकारे देवीहसोळ गाव हे देवी देवतांच्या आशीर्वादाने पावन झालेल आणि नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल सुंदर असं गावं आहे.