१) चैत्र नवमी
चैत्र महिन्यामध्ये वद्य नवमीच्या दिवशी नंदादीप लावून कुमारिकेचे पूजन करुन महाप्रसादाचा कार्यक्रम होतो तत्यावेळीस देवीला खण, कापड देतात.
२) नारळी पौर्णिमा
श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व देवतांची व देवीची अभिषेक पुजा होवून त्यांना पोवते घातले जाते. त्यानंतर देवीहसोळ गावात प्रत्येकाचे घरोघरी गाव परंपरे प्रमाणे पोवते पोहचविले जाते. या कार्यक्रमाला भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती असते.
३) त्रिपुरी पौर्णिमा
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुरांचा वध केल्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा होतो. दिवसभर मंदीरात पारायण चालू असते. सायंकाळी
त्रिपुर (दिपमाळ ) वरती पणतीची विधीवत पुजा करुन प्रज्वलीत करुन ठेवली जाते. यानंतर भोजनाचा कार्यक्रम व याच दिवशी मंदीरात तुळशी विवाह होतो. या कार्यक्रमाला भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती असते.
४) देव दिपावली
मार्गशिर्ष महिन्यातील प्रितपदेच्या दिवशी हा उत्सव होतो. सकाळी मंडळी मंदीरात सडा समार्जन करुन रंगवल्याही शोभा वाढवून आणली जाते. सर्व देवतांची रुपे स्वच्छ करुन लावली जातात. देवता सजविल्या जातात. पुचा अर्चा, नैवेद्य केला जातो. सायंकाळी गुरव गावातील प्रत्येकाच्या घरी दिवा घेवून जातात.
५) शिमगोत्सव
फाल्गुन महिन्यातील एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत हा उत्सव चालतो. परंपरेप्रमाणे देवीची पूजा करुन नैवेद्य केला जातो. एकादशीच्या दिवशी सायंकाळी खेळे मांडावर बसतात. दुसरे दिवशी एक नंबर मानकर्यांच्या हुकुमावरुन व एक नंबर गावकर्याच्या जबाबदारीवर खेळे बाहेर जातात. पौर्णिमेच्या दिवशी खेळे गावात येतात. सुडमाडाची होळी घेवून खेळे आणि ग्रमस्त श्री गणपती मंदीराजवळ येतात. त्या ठिकाणी होळी नाचवून देवीच्या हुकमाने उभी केली जाते. होळी उभी झाली की तिची पुजा करुन गार्हाणे केले जाते. या होळी च्या दिवशी सुमारे चारशे भाविकांची उपस्थिती असते. यानंतर खेळे परंपरेनुसार गावात नाचतात.
६) शिंपणे
होळी झाल्यावर पंचमीच्या दिवशी देवला मांगलीक स्नान घातले जाते. माखण झाल्यावर देवीचे तिर्थ गावात घरोघरी गुरव घेवून जातात.