मार्गशिर्ष वद्य अष्टमी आणि नवमी या दोन दिवस देवीची मोठी म्हणजेच राजापूर तालुक्यातील प्रशिध्द अशी यात्रा भरते. या यात्रेचे महत्व गावात इतके असते की घरातील सण किंवा लग्न कार्य यापेक्षाही मोठे असते. कारण गावातील चाकरमान्यासह पाहुणे मंडळी आणि गावाच्या बाजूच्या व गावातील भाविकही या यात्रेस मोठ्या संख्येने येतात. या जत्रौत्सव सोहळ्याची सुरूवात व नियोजन संपुंर्ण गावाच्या नियंत्रणा खाली व श्री. आर्यादुर्गा देवी व श्री.जाकादेवी विश्वस्त संस्थेच्या देखरेखीखाली होते.
मार्गशिर्ष सप्तमीच्या आधल्या दिवशी म्हणजे यात्रा सुरूहोण्याच्या एक दिवस आधी देवीहसोळ गावाचे संपुर्ण ग्रामस्त श्री. माता जाकादेवीला कौलप्रसाद (साकडे) लावुन कार्यक्रम करणे बाबत दोन्ही देवींचे मत मागतात. सर्व धार्मिक कार्य गावातील रितीरिवाजा प्रमाणे पूर्ण होण्यासाठी व मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकावरती कोणत्याही प्रकारची अडचण अथवा अनिष्ट येऊ नये व सोहळा आनंदांत सुरळीत पार पडण्यासाठी ग्रामस्तांच्या वतीने देवीला साकडे घालण्यात येते. संपुर्ण विधी पूर्ण करून गावातील ग्रामस्थ प्रसाद घेऊन मंदीरात माघारी येतात.
पहिला दिवस मार्गशिर्ष सप्तमी ➖
यादिवशी सकाळी श्री.आर्यादुर्गा देवी च्या मंदीरात सर्व मानकरी व ग्रामस्तांच्या उपस्तिती भालावली(राजापूर) गावाच्या माता नवदुर्गेला माघारी जाण्यासाठी गावातील खेळे परंपरेनुसार श्री नवदुर्गादवीचे माघारी म्हणुन पाठवले जातात. प्रथेनुसार देवीला साडी चोळी, भेटवस्तू व मानपानाचे सर्व साहित्य घेऊन मानाचे खेळे भालावली गावी जाण्यास मार्गस्त होतात. त्यानतंर सारे देवीहसोळ गावातील सर्व गावकरी ईतर धार्मिक कार्य व देवीचा उत्सवाची (जत्रा) तयारी करण्यासाठी गुंतलेले असतात.तिथुनच खर्या अर्थाने देवीचा उत्सव(जत्रा) सुरु होते. लोकांची दर्शनासाठी येण्यासाठी रेलचेल चालु होते. यात्रेस गावातील छोट्या-मोठ्या व्यापार्यापासून पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आलेल्या अनेक व्यापारी जत्रौउत्सवात दुकानाची मांडणी करण्यास सुरवात करतात व सायंकाळी ४ वा.पासुन जत्रेला सुरूवात होते.


सायंकाळी सांजप्रहरी देवीला माघारी गेलेले मानाचे खेळे माघारी येऊन श्री नवदुर्गेदेवीचा आदेश घेऊन परत येताच भरजत्रेला सुरवात होते आणि चोहीकडे आनंद पसरतो. अष्टमीच्या रात्री १२ वाजल्यानंतर भालावली गावाची श्री नवदुर्गा देवी श्री आर्यादुर्गा देवीच्या भेटीस येते. मध्यप्रहरी श्री देवी नवदुर्गा येण्याची चाहुल लागताच रोषणाईच्या प्रकाशात,आणि फटाकांच्या आतिषबाजीची सुरवात होते.संपुर्ण ग्रामस्थ व सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुर लागलेली असते. देवीचे आगमन लांबुनच होत असताना गावातील मानकरी ज्योत पेटवुन ती ज्योत भालावली श्री नवदुर्गा मातेचा मार्ग मोकळा करत असतात .नवदुर्गेचे आगमन मांडावर होताच फटाक्यांची आतिषबाजीची सुरवात होते आणि देवींच्या जयजयकारात सारा परिसर दुमदुमुन जातो.जत्रेला उपस्तित प्रत्येक भाविक देवीचे ते तेजस्वी रुप पाहून हर्षाने बेफान होऊन ते तेजस्वी रुप आपल्या डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो व मातेला साश्रुनयनाने नमस्कार करत लोटांगण घालतो. श्री नवदुर्गा मातेची पालखी देवीचा मांडावर विसर्जमन करण्यात येते.


गावातील सर्व मानकरी व ग्रामस्त दिंड्या पताका, अबदागीर,घेवून मांडावर येण्यासाठी भूपआरत,व घंटानाद करीत वाजत गाजत देवींचा जयजयकार करीत मांडावर येतात. तिथे भालावली गावचे पुजारी पालखीतुन श्री नवदुर्गेदेवीला बाहेर घेऊन मांडाच्या मध्यभागी देवीला बसविले जाते व त्याचवेळी परंपरे नुसार गावातील मानकरी देवीचा मांडावर असलेल्या खळग्यातुन ’फुरसे“ (विषारी सर्प ) बाहेर काढून देवीवरून ओवाळुन टाकतात. अन्यथा विषारी असणारे फुरसे कोणालाही काहीच करत नाही हे या दिवसाचे व यात्रे व मुख्य वैशिष्ट होय.

त्यानंतर भालावली गावाचे ग्रामस्थ माता नवदुर्गा देवीला देवीहसोळ ग्रामस्तांच्या कडे सुपुर्त करतात. तिथुनच दिंडीला सुरूवात होते. सर्व ग्रामस्त, भाविक आंनदाने नाचत वाजत गाजत दिंडी सोहळ्याची मजा लुटत मंत्रमुग्ध होऊन मंदीराच्या दिशेने मार्गस्त होतात. हळुहळु देवींचा जयघोषकरीत दिंडी पुढे पुढे सरकत असताना अतिशय अदभूत आसा तो क्षण समोर येतो.
"साक्षात देवी नवदुर्गा आपल्या भगिनीला भेटण्यासाठी माता जाकादेवी च्या दिशेने झेपावते. जाकादेवी समोर गळाभेट होते तो क्षण म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा"
त्यानंतर माता आर्यादुर्गा देवी ला भेटण्यासाठी देवी नवदुर्गा त्या गर्दीतुन मार्गस्त होते. देवीच्या जयजयकारात देवी हळुहळु सरकत मंडपाच्या प्रवेश द्वारापाशी थांबते. देवी नवदुर्गेचे कुंमकंमतिलक करुन औक्षण केले जाते व तिथे प्रथेनुसार धार्मिक विधी आटोपुन देवी श्री नवदुर्गा माता श्री आर्यादुर्गा मातेच्या च्या समिप जावुन गळाभेट घेते .आणि आर्यादुर्गा देवी शेजारी स्थानपन्न होते. भाविकांच्या व ग्रामस्तांच्या आयुष्यातील हाच तो अनमोल क्षण.
आसा हा श्री आर्यादुर्गा देवी, श्री जाकादेवी व श्री नवदुर्गा देवी यांच्या भेटीचा अत्भुत आणि अविषमर्नीय सोहळा !!

दुसरा दिवस➖ मार्गशिर्ष अष्टमी ➖
संपूर्ण दिवसभरात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लांबच लांब रांगा लगतात. ह्याच दिवशी देवीहसोळ गावातील ग्रामस्थ श्री जाकादेवी मातेला आपल्या मुलांचा पाळणा देतात. संपूर्ण मंदिर परिसरात मांडलेल्या विविध दुकानातुन भाविकांची खरेदी करण्यासाठी धडपड दिवसभर चालु असते. शवटी ४वा.नंतर देवी नवदुर्गा माता आपल्या भगिनींचा तो सहवास व भटीगाठी घेवून आपल्या स्थानी जाण्यास मार्गस्त निघते .सर्व ग्रामस्त व भाविक देवीला निरोप देण्यासाठी देवी बरोबर जड पावलानी व साश्रुनयनाने वाजत गाजत देवीचे ते तेजस्वी रुप डोळ्यात साठवून जड अंतकरणाने देवीला नमस्कार करीत निरोप देतात व श्री देवीनवदुर्गा पालखीत विराजमा होऊन आपल्या स्थानी जाण्यास मार्गस्त होते. इथे यात्रा संपते.
